Thursday, September 29, 2011

विशेष मुलांच्या पंखांना नवे बळ देण्यासाठी कटिबध्द - वर्षा भगत

मानसिक क्षमतांवर मात करणं एकवेळ शक्य होतं, पण शारीरिक अपंगत्वावर योग्य ते उपाय होणंच गरजेचं असतं. या अपंगांचं केवळ शारीरिक पुनर्वसनच नव्हे, तर त्यांना पुढील आयुष्यात सर्वार्थानं स्वत:च्या पायावर उभं करण्याकरता नवी मुंबई महानगरपालिकेचे ETC तथा अपंग शिक्षण व प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र कार्यरत असून त्यांच्या पंखांना नवे बळ देण्यासाठी कटिबध्द असल्याचे या केंद्राच्या संचालिका वर्षा भगत यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेने सुरु केलेल्या या ETC केंद्राची धुरा वर्षा भगत संचालक या नात्याने गेली चार वर्ष समर्थपणे सांभाळत आहेत. विशेष विद्यार्थ्यांना शिकविण्याचा व इतर शैक्षणिक कामाचा त्यांना १२ ते १३ वर्षाचा अनुभव आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणजे २००९-१० चा ‘पंतप्रधान पारितोषिक’. तत्कालीन आयुक्त विजय नाहटा व वर्षा भगत यांना या ई.टी.सी. प्रकल्पासाठी गौरविण्यात आले आहे. २८ सप्टेंबर या जागतिक कर्णबधीर दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली ही बातचित.

प्रश्न- अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यामागे काय भूमिका होती?
उत्तर- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अपंग व्यक्ती व विद्यार्थी यांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. विजय नाहटा यांच्याबरोबर २८ जून २००७ रोजी अपंग शिक्षण व प्रशिक्षण व सेवा सुविधा केंद्र सुरु केले. विविध अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी व अपंग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणारी नवी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका आहे. विशेष शिक्षणाबरोबरच एकात्म शिक्षण, समावेशित शिक्षण, दूरशिक्षण, गृह प्रशिक्षण आदी शिक्षणाचे सर्व पर्याय एका छताखाली उपलब्ध करुन देणारे हे पहिले अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र ठरले आहे.

विशेष विद्यार्थ्यांना शिकविण्याचा व इतर शैक्षणिक कामाचा माझा १२ वर्षाचा अनुभव आहे. अपंग मुल हीच माझी खरी प्रेरणा आहे. वेगवेगळ्या क्षमतेच्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या समवेत एकत्रित शिक्षणक्षम गटात आणून त्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक पुनर्वसन करणे आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळविण्यासाठी सक्षम बनविणे त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात योगदान देणारी व्यक्ती बनविणे हा या केंद्राचा प्रमुख उद्देश आहे व तो साध्य करण्यासाठी मी व माझे सहकारी कार्य करीत आहोत. विद्यमान आयुक्त भास्कर वानखेडे व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र वाटचाल करीत आहे.

सर्वप्रथम २००७ मध्ये कर्ण बधिरांसाठी शाळा सुरु करण्यात आली. त्यानंतर टप्प्या टप्प्याने २०१० पर्यंत मतिमंद, अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांकरीता शाळा सुरु केल्या. तसेच बहुअपंगत्व, स्वमग्न, एकात्म शिक्षण, गृह प्रशिक्षण, वैयक्तिक प्रशिक्षण वर्ग, बाह्य रुग्ण विभाग आदी विभाग सुरु करण्यात आले. सद्यस्थितीत येथे ३५० विशेष विद्यार्थी शिक्षण व प्रशिक्षण घेत आहेत. विशेष शिक्षक, वाचा तज्ज्ञ, श्रवण चाचणी तज्ज्ञ, भौतिक उपचार तज्ज्ञ, समुपदेशक, समाज सेवक, सह शालेय शिक्षक असे ७० विशेष तज्ज्ञ मार्गदर्शकांसह ३० अन्य असे सद्यस्थितीत १०० कर्मचारी केंद्रामध्ये कार्यरत आहेत.

प्रश्न- या केंद्राच्या माध्यमातून या विशेष मुलांना प्रवाहात सामील करून घेण्यासाठी काय प्रयत्न करण्यात येतात?
उत्तर- कर्णबधिर मुलांच्या अभ्यासात मौखिक पद्धतीवर विशेष भर दिला जातो. पूर्व प्राथमिक वर्गासाठी शाळेने स्वत:ची अभ्यासक्रम पद्धती विकसित केली आहे. अपंग विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात भाषा विषयक जास्तीत जास्त उतारे, अभिनय गोष्टी, प्रात्यक्षिके यांचा वापर केला जातो. प्राथमिक वर्गासाठी शाळा, महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाचा अभ्यासक्रम वापरते. येथील शिक्षण प्रशिक्षण पद्धतीत शिक्षक, बालक आणि पालक यांचा समन्वय साधल्याने विद्यार्थ्यांमध्ये चांगला सकारात्मक बदल झालेला पहावयाला मिळतो. पाठ निरीक्षणासाठी विद्यार्थ्यांबरोबर येथे पालकही उपस्थित राहतात. त्यांनाही या विशेष मुलांच्या शिक्षण पध्दतीचे अवलोकन मार्गदर्शन व समुपदेशन देण्यात येत असल्याने पालकांनाही बारकाईने निरीक्षण करता येते.

या मुलांना विशेष शिक्षणाबरोबरच श्रवण-वाचा प्रशिक्षण तसेच अपंग प्रवर्गातील मुलांसाठी ऑक्युपेशनल थेरेपी, फिजिओथेरेपी यांचाही उपयोग केला जातो. याबरोबरच मुलांना संगीत, चित्रकला, हस्तकला, शारीरिक शिक्षण यासारखे विषयही शिकवले जातात. शालेय शैक्षणिक सहलीचे आयोजनही केले जाते. या केंद्रात विशेष प्रशिक्षण देऊन विद्यार्थांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे सर्वसामान्य शाळेमध्ये पाठविले जाते.

प्रश्न- या केंद्राची प्रमुख वैशिष्ट्यं काय आहेत?
उत्तर- या केंद्रातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व प्रशिक्षण देण्यात येते. याशिवाय अपंगत्वाचे मोफत निदान व उपचार, मोफत शैक्षणिक साहित्य, गणवेश केंद्रामार्फत दिला जातो, घरापर्यंत बस सुविधाही दिली जाते, वर्षातून दोनवेळा वैद्यकीय तपासणी, आवश्यक लसीकरण, डिजीटल श्रवणयंत्र इत्यादी मोफत दिले जाते. शिवाय समुपदेशन, मार्गदर्शन आणि पालकांना प्रशिक्षण तसेच सर्वसामान्य शिक्षकांकरिता विशेष प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. मुलांकरिता Toy Library, शिक्षक व विद्यार्थ्यांकरिता ग्रंथालय उपलब्ध आहे. वय वर्ष शून्यपासून मुलांना या केंद्रात प्रवेश दिला जातो. मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची सोय आहे. त्याशिवाय केंद्रातील अथवा केंद्राबाहेरील इंटिग्रेटेड विद्यार्थ्यांकरिता सपोर्ट सिस्टिम, १०० टक्के विशेष प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची भरती, विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार स्वतंत्र अभ्यासक्रमाचे नियोजन, शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शनपर शिबीरे, कार्यशाळांचे आयोजन आदी उपक्रमही राबविले जातात.

Quality Council of India मार्फत स्कुल ऍक्रीडीटेशनचे काम प्रगतीपथावर आहे. शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे बी.एड., एम.एड. तसेच कर्णबधिर, मतिमंद व सर्वसामान्य मुलांना शिकविणारे प्रशिक्षणार्थी हे या केंद्राच्या प्रशिक्षण वर्गाच्या निरीक्षणासाठी येतात. हे केंद्र १०० टक्के संगणकीकृत करण्यात आले आहे. अपंग व्यक्ती, विद्यार्थी व त्यांच्या पालकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ध्रुवतारा (१८ वर्ष वयाखालील अपंग विद्यार्थ्यांकरिता), भरारी (१८ वर्ष वयापेक्षा अधिक अपंग व्यक्तींकरिता) व श्रेय (अपंग विद्यार्थ्यांच्या पालकांकरिता) या पुरस्कारांचे आयोजन व वितरण केले जाते.

प्रश्न- या केंद्राच्या माध्यमातून कोणते विशेष लाभ देण्यात येतात?
उत्तर- या केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांच्या अटी व शर्ती पूर्ण करुन या विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतात. कर्णबधिरांकरिता Cochlear Implant सर्जरीसाठी प्रत्येकी १ लाख रुपये आर्थिक सहाय्य योजना, अपंगांना स्वयंयरोजगाराकरिता प्रत्येकी रुपये ४० हजार, पाठ निरिक्षणासाठी उपस्थित राहिलेल्या पालकांना प्रत्येकी प्रतिदिन ५० रुपये विद्यावेतन, प्रौढ अपंगांना मासिक प्रत्येकी रुपये ५००, अपंगांकरिता रोजगाराभिमुख योजना याशिवाय मोफत चलन वलन साहित्य (डिजीटल श्रवणयंत्र, कृत्रिम हात व पाय, कुबडय़ा व्हिलचेअर, अंधासाठी काठी इ.) दिली जाते.

अपंगांबाबत समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी अपंग शिक्षण व समस्या यावर पथनाट्य सादर करणे, अपंगांच्या योजनांविषयक माहितीपत्राचे वितरण करणे, मुंबई मॅराथॉनमध्ये सहभाग घेणे, अपंगांच्या समस्येवर चित्रफिती बनविणे, अपंग व्यक्तींनी आयोजित केलेल्या कामाची बातमी विविध प्रसारमाध्यमातून प्रसिध्द करणे, जागतिक अपंग दिन, कर्णबधिर दिन, मानसिक आरोग्य दिन आदी कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे जनजागृती करणे, केंद्रातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू विकण्याकरिता बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्याकरिता स्वयंरोजगार किंवा नोकरी उपलब्ध करुन देण्यात मदत करणे आदी सामाजिक पुनर्वसन उपक्रमांतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

प्रश्न- कर्णबधिर मुलांच्या शिक्षणाबाबत समाजात उदासिनता आहे ही दूर करण्यासाठी कोणते प्रयत्न व्हायला हवेत असे आपल्याला वाटते?
उत्तर- कर्णबधिरत्व हे वरवर न दिसून येणारे अपंगत्व आहे आणि इथेच सगळयात मोठी अडचण आहे. ती अशी की ते दिसत नसल्यामुळे वयाच्या साधारणपणे तिसर्‍या वर्षापर्यंत ते लक्षातच येत नाही. अर्थात हल्ली सायन्स व टेक्नॉलॉजीमुळे गरोदरपणातही या अपंगत्वाचे निदान होऊ शकते. याबाबत आजही हवे तसे प्रबोधन आढळत नाही. ज्या वयात सर्वसाधारण मूल बोलायला लागते त्या वयातही आपलं मूल `बोलत नाही आणि आवाजही ऐकत नाही` हे लक्षात यायला हवे असतं. पण अंधत्व, मतिमंदत्व किंवा शारीरिक व्यंग या अपंगत्वासारखा डोळ्याला काहीच पुरावा दिसत नाही, त्यामुळे त्याचे निदान होत नाही. त्याहीपेक्षा आपल्या मुलाच्या अपंगत्वाचा स्वीकार करणं अवघड जातं. या बाबतची मानसिकता तयार होऊन त्याच्या भवितव्याचा विचार करेपर्यंत मुलाने `भाषाविकासाची अत्यंत संवेदनक्षम अशी वयाची तीन वर्षे कधीच पार केलेली असतात. `श्रवणर्‍हास लक्षात येऊनही लवकरात लवकर त्यावर उपचार सुरू केले नाहीत, तर `भाषा व वाचा`ची समस्या निर्माण होते. या समस्या वेळीच योग्य प्रकारे हाताळल्या नाहीत तर `शैक्षणिक समस्या` डोकं वर काढू लागते आणि या समस्या जर वेळीच थांबवल्या नाहीत, तर मात्र याचा उलट परिणाम मुलाच्या लेखन, वाचन, वैचारिक, सामाजिक व भावनिक वाढीवर होतो.
मुलाचे वय शाळाप्रवेशाच्या वेळी कधी ७-८ तर कधीकधी १२-१३ वर्षेही असते.
पर्यायाने ते सामान्य मुलांच्या बरोबरीने विकास करू शकत नाही. त्यांना विशेष लक्ष न दिल्याने त्यांचा विकास खुंटतो हे कुणाच्याही लक्षात येत नाही. हे कर्णबधिर मुलांच्या शालेय जीवनातच घडते तर पुढील पुनर्वसनाचे काय, असा मोठा प्रश्न वाचकांना पडणे साहजिकच आहे. मुंबई शहराच्या परिस्थितीत हल्ली फरक पडत आहे. कर्णबधिर मूल निदान वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी शाळेत यायला लागले आहे.
आपल्या कर्णबधिर मुलांसाठी, त्याच्या शिक्षण पुनर्वसनासाठी काटेकोर प्रयत्न करण्याची इच्छा बाळगली पाहिजे. ही मुलेसुद्धा व्यवस्थितपणे माध्यमिक, उच्च माध्यमिक अभ्यासक्रम पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकतात, घेतात. पूर्णपणे स्वावलंबी आयुष्य जगू शकतात. फक्त त्यांना आपल्या सर्वांच्या आधाराची, मार्गदर्शनाची गरज असते. नवी मुंबईमधील परिस्थिती पाहता खरेच आशेचा किरण दिसून येतो आहे. सध्या भारत सरकारही `सर्व शिक्षा अभियान` ही जोरदार मोहीम राबवत आहे. या मोहिमेची उद्दिष्टे, त्याची तयारी जोरदार आहे. परंतु संपूर्ण देशात शिक्षण व पुनर्वसनाचे नियोजन, अंमलबजावणी, पर्यवेक्षण व तपासणी ही सार्वत्रिक असावी ज्यामुळे सर्वांना समान लाभ मिळेल केंद्र व राज्य सरकार चांगल्या प्रकारे प्रयत्न करीत आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनाही याकामी पुढाकार घेऊन सुविधा द्यायला हव्यात.

अपंग मुलांच्या पालकांना स्वत:च्या मुलांच्या मर्यादित क्षमतेचा स्वीकार करून पुढचा मार्ग काढायचा असतो. अपंगत्वाच्या निदानानंतर त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून मुलांच्या योग्य विकासासाठी सल्ला घेतला पाहिजे. अंध व कर्णबधीर मुलांना सुरुवातीला विशेष शाळेमध्ये घालून काही काळानंतर सर्वसामान्य मुलांच्या शाळेत जाणे जमू शकते. अस्थिव्यंगांमध्ये मुलांनाही शाळेत नेण्या-आणण्याची सोय झाल्यास शिक्षणाच्या बाबतीत फारशा अडचणी येत नाहीत पण मानसिक विकलांग व स्पास्टिक मुलांच्या बाबतीत मुलांच्या क्षमतेनुसार त्यांना शालेय शिक्षण घेणे कितपत शक्य आहे, याचा अंदाज घ्यावा लागतो.

अपंगत्वाच्या प्रकारानुसार पालकांचे मुलांच्या विकासाचे उद्दिष्ट वेगवेगळे असू शकते. मुलांच्या अपंगत्वाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्त्वाचा! हे सांगणे जेवढे सोपे तितकेच आचरणात आणणे अवघड आहे यात शंका नाही. मुलांना घरातील रोजचे व्यवहार व बाहेरच्या जगात वावरण्यासाठी जास्तीत जास्त स्वावलंबी बनविणे हे सर्वांचेच ध्येय असले पाहिजे. मुलांचे सतत निरीक्षण केल्यास त्यांना कुठल्या गोष्टीत जास्त आवड आहे किंवा शारीरिक/ मानसिक क्षमता आहे याचा अंदाज पालकांना येऊ शकतो. या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर कसा क़रता येईल व मुलाच्या वाढीसाठी त्याचा कसा उपयोग करता येईल याबद्दल मार्गदर्शन घेतले पाहिजे. जर पालकांकडून पुरेसे प्रेम, सुरक्षितता, मार्गदर्शन मुलांना मिळाले तर त्यांच्या प्रगतीवर नक्कीच चांगला परिणाम होतो.

प्रश्न- अपंग मुलांच्या विकासामध्ये पालकांची भूमिका काय असावी असे आपल्याला वाटते?
उत्तर- मुलांना शाळेत घातले की त्यांना सर्व आलेच पाहिजे, असा अट्टाहास नसावा. काही पालकांना मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी शिक्षकांचीच आहे असे वाटते. ही वृत्ती अर्थातच चुकीची आहे. काही पालकांना असे वाटते की, आपली अपंग मुले कितीही प्रयत्न केले तरी चारचौघांसारखी होणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर जास्त मेहनत घेण्यात काही अर्थ नाही. काही पालकांना आपल्या मुलांना शिकवणे तितकेसे सोपे नाही याची जाणीव झाल्यावर ते त्यांच्यावर मेहनत घेण्याची टाळाटाळ करतात तर काहीजण सर्व काही शाळेच्या भरवशावर सोडून मोकळे होतात. अर्थातच या प्रकारच्या दृष्टिकोनाचा मुलांच्या भवितव्यावर फार विपरित परिणाम होतो. पालकांनी आपल्या मुलांच्या मर्यादा लक्षात घेऊन शिक्षक शाळेत काय व कसे शिकवतात याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. शिक्षकांना विचारून घरी कशा प्रकारे शिकवायचे, हे समजावून घेतले पाहिजे.

सर्वसाधारणपणे पालकांच्या बाबतीत बरेचदा असे लक्षात येते की, अपंग मुलांच्या गरजा खूप जास्त असतात व एकेकट्या पालकांना शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या ते परवडणे कठीण असते. अशा वेळी समान अडचणी असणार्‍या पालकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. पालक एकत्र येऊन एकमेकांच्या अडचणी समजावून घेऊ शकतात. काही समस्यांवर एकत्र विचार करून उपाययोजनाही करू शकतात. यामुळे मानसिक आधार मिळतो व विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते. सगळ्यांच्या सहभागातून काही सुविधा उपलब्ध होऊ शकतात. यशस्वी पालकांच्या उदाहरणातून इतरांना स्फूर्ती व दिशा मिळू शकते. सहनशीलता वाढते. यामुळे पालकांचा व अपंग मुलांचा आत्मविश्वास वाढण्यासाठीही उपयोग होतो.

प्रश्न- विकलांग बाळाच्या जन्माचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणत्या प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे?
उत्तर- विकलांग बाळाच्या जन्माचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनस्तरावर मोठया प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे. आरोग्य विभागामार्फत ज्या प्रमाणे पोलिओ निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येते त्याप्रमाणे विकलांगता निदान चाचणी प्रत्येक गर्भवती स्त्री व नवजात बाळाला बंधनकारक करणे आवश्यक आहे. बाळाच्या जन्मानंतर त्याची वैद्यकीय तपासणी होऊन विकलांगता आढळल्यास त्यावर तातडीने उपचार करणे शक्य होईल. याबरोबरच गरोदर स्त्रिचा विमा उतरविणे बंधनकारक केले पाहिजे. ज्यामुळे जरी अपंग मूल जन्माला आले तरी त्याच्या उपचारासाठी व पूनर्वसनासाठी एक ठराविक रक्कम त्या स्त्रीला मिळू शकेल. अपंग व विकलांग मुलांच्या पूनर्वसनासंदर्भात जनजागृती होऊन त्यांना आवश्यक त्या सुविधा त्यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतराच्या आत उपलब्ध करुन देण्यात याव्यात.

सामान्य मुलांच्या शाळांमध्ये अपंग मुलांसाठी तीन टक्के आरक्षण असते. या शाळांमध्ये अपंग मुलांच्या शिक्षणाचा हक्क नाकारला जाणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. तसेच या शाळांमध्ये या मुलांसाठी स्वतंत्र संदर्भ कक्ष असावा. तसेच या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रत्येक सर्वसामान्य शाळेत किमान चार विविध प्रवर्गातील विध्यार्थ्यांना शिकविणाऱ्या विशेष प्रशिक्षित व्यक्तींची नेमणूक करणे आवश्यक आहे.

प्रश्न: या केंद्राच्या माध्यमातून भविष्यात कोणते उपक्रम राबविण्यात येणार आहेत?
उत्तर: अपंग व विशेष मुलांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणाऱ्या या केंद्राच्या माध्यमातून या मुलांना प्रभावी व सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. आगामी काळात अपंगत्व निदान व प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक ते तपासणी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तसेच अपंग विमा योजना सुरु करणे, अत्याधुनिक ई.टी.सी. केंद्राचे ५० हजार स्क्वेअर फुटाचे सुरु असलेले बांधकाम पुर्णत्वास नेणे इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.

शासन स्तरावर चाळीस टक्के दोष असणाऱ्यांनाच अपंग प्रमाणपत्र दिले जाते व त्यांच्यासाठीच योजना राबविण्यात येतात. पण ज्यांच्या अपंगत्वाचे प्रमाण ३० ते ३९ टक्के आहे अशा मुलांची अवस्था 'ना घर का, ना घाट का' अशी होते. या गटातील मुलांच्या शिक्षणासाठी व पूनर्वसनासाठी प्रयत्न करणे, गतिमंत व अंध मुलांकरिता शाळा सुरु करणे, विशेष प्रशिक्षित शिक्षक तयार करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेणे या प्रमुख उपक्रमांबरोबरच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही प्रमुख उद्दीष्टे आहेत.

प्रश्न- या दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण काय संदेश द्याल?
उत्तर : अपंगत्व हा सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित असलेला घटक आहे.अपंग व्यक्ती आपल्या घरात जन्माला आल्यानंतरच त्याला मदत करायची हा दृष्टिकोन न बाळगता, कायम मदतीच्या भूमिकेत राहावे. शिक्षकांनीदेखील अपंग विद्यार्थ्यांना आपले मुल समजून वाढवावे तसेच दिवसेंदिवस बदलनाऱ्या तंत्रांचा अवलंब आपल्या शिकविण्याच्या पद्धतीत करावा. या अपंग विद्यार्थ्यांच्या नकारात्मक बाजूचा विचार न करता, सकारात्मक बाजू विचारात घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे.
अपंग मुल हे समाजाचे मुल झाल्यास त्यांचा अपेक्षित विकास साध्य होईल तरी सर्व अपंग शाळांनी आपली भूमिका, संदर्भ व सुविधा केंद्र (Resources center) सुरु करावीत असे वाटते.

No comments:

Post a Comment